Popular Posts

Wednesday, July 22, 2015

उत्तररंगचा जिव्हाळा आणि प्रेम इथं साकारलं

बृहन्‍महाराष्ट्र मंडळाचं १७वे अधिवेशन नुकतेच लॉस एंजेलिसमध्ये पार पडले. मराठी अमेरिकनांचा तीन दिवसांचा सांस्कृतिक-बौद्धिक, व्यावसायिक उत्सव असलेल्या तीन पिढ्यांच्या या सोहळ्याचे वेगळेपण म्हणजे यावेळी पहिल्यांदा 'उत्तररंग' परिषदेला वाहिलेला एक संपूर्ण दिवस! तीनशे लोकांची उपस्थिती परिषदेची गरज अधोरेखित करत होती.
स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या लोकांना आयुष्याच्या पूर्वकाळाचा तसा उत्तरकाळाचाही वेगळा विचार करावा लागतो. विशेषतः साठ-सत्तरच्या दशकात आलेली पहिली पिढी आता निवृत्त झाली आहे. यासाठी जानेवारी २००४ पासून बृ. म. वृत्तात 'उत्तररंग' हे सदर गेली १०/१२ वर्षं सातत्यानं सुरू ठेवून डॉ. अशोक सप्रे आणि विद्या सप्रे यांनी या विषयाला सर्वप्रथम हात घातला. चर्चेसाठी वृत्ताचे हे व्यासपीठ निर्माण झाल्यावर आपले विचार व्यक्त करणे, माहिती पुरवणे अशा पद्धतीनं लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानं प्रेरित होऊन सप्रे दाम्पत्यानं इतरांबरोबर काही गावांत छोट्या परिषदा घेतल्या.

तसं पाहिलं तर सोळापैकी जवळजवळ प्रत्येक अधिवेशनात 'निवृत्तीसाठीची योजना' या विषयावर २/३ तासांचा परिसंवाद झाला होता. मात्र 'उत्तररंग' हा बृ. म. मंडळाचा भाग असावा याबद्दल सप्रे दांम्पत्य आग्रही होते. त्याची कारणं सांगताना डॉ. अशोक म्हणाले, 'त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जलद पोहोचता येईल. दुसरं म्हणजे एक अधिकृत स्वरूप मिळाल्यानं सरकारी मदतीचं पाठबळ मिळणं सोपं जाईल. या विषयासंदर्भात काम करणाऱ्या गटांना एका सूत्रात बांधून त्यातून 'व्हर्च्युअल कम्युनिटी' अशी 'उत्तररंग वसाहत' होऊ शकेल आणि त्यातूनच प्रत्यक्षात अशी वसाहत (पुण्यातील 'अथश्री'सारखी) बांधून द्यायला अनेक बांधकाम व्यावसायिक पुढे सरसावतील'!

सप्रे यांचं हे अनुमान परिषदेत प्रत्यक्षात उतरलं. संपूर्ण परिषदच प्रायोजित केली होती पुण्याच्या 'परांजपे स्कीम्स' या बांधकाम व्यवसायातल्या अग्रगण्य कंपनीनं! डॉ. मोहन आगाशे यांनी परिषदेचं उद्‍घाटन करून 'जागोजागी छोटा महाराष्ट्र निर्माण करण्याच्या प्रयत्नांना दाद दिली. शशांक परांजपे यांनी व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन दिलखुलास गप्पा मारल्या. 'इथली मंडळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आपली मराठी अस्मिता दाखवतात. अभिमानानं भारताशी जोडून राहतात. आपला पूर्वेतिहास विसरत नाहीत. त्यामुळे परिषद प्रायोजित करून त्यांना आर्थिक मदत करणं मला गरजेचं वाटलं!' असं ते म्हणाले. इथे 'अथश्री'सारखे प्रकल्प करण्याची त्यांची इच्छा आणि तयारी दिसली. दोन्हीमध्ये काय साम्य किंवा बदल असतील याचं चित्र उभं करताना शशांक म्हणाले, 'अहो पुण्यात काय किंवा अमेरिकेत काय, माणूस तोच! त्याच्या गरजा, धकाधक आणि एकाकीपणाही तोच! वार्धक्याची चाहूल लागल्यावर इथेही असहायता येतेच. निवृत्त झाल्यावर आपलं खाणंपिणं, सांस्कृतिक गरजा, समवयस्कांचा सहवास त्यांना अधिक भावतो. त्यामुळे जर इथे भारतीयांसाठी 'अथश्री'सारखे प्रकल्प सुरू केले, तर त्यात 'छोटा भारत'च येईल! मूळचे भारतीय म्हणून एकसूत्रता आणि प्रांतातली विविधता यांचा तो सुंदर मिलाफ असेल आणि विविध खाद्यपदार्थ, वेगवेगळे सणवार यातून तो जल्लोषात व्यक्तही होईल याची खात्री वाटते!'

इगी इग्नीशियस या १९७९ मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी चेन्नईतून आलेल्या भारतीय इंजिनीअरनं २००८ पासून 'फ्लोरिडा'मध्ये 'शांतिनिकेतन' या नावानं भारतीयांच्या वसाहती बांधायचा श्रीगणेशा केला. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाल्यानं त्यानं आता शिकागो, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन डी. सी. आणि मलेशियातही हे प्रकल्प सुरू केले आहेत. प्रत्येक राज्यातूनच त्यांना विचारणा होतेय. याची पुढची पायरी म्हणजे कमकुवत आर्थिक गटातल्या भारतीयांसाठी इगीनं आता 'शांतिनिकेतन आश्रम' बांधायला घेतले आहेत. भारतीय भोजनासकट इथे त्यांना अल्प दरात राहता येईल. यासाठी देणग्या गोळा करण्याचं कामही सुरू आहे. पत्नी आजारी असूनही त्यानं परिषदेला हजेरी लावली.

डॉ. दिलीप जेस्ते हे ज्येष्ठांचे मनोविकार तज्ज्ञ आहेत. 'निष्क्रीय वृद्धत्वापासून सक्रीय आणि सकारात्मक वृद्धत्वाकडे वाटचाल करण्यातल्या विज्ञानातल्या विस्मयजनक संशोधनाकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले, 'नातवंडांना वाढवताना मेंदूची शारीरिक वाढ नव्या जोमानं होते हे लक्षात आलं. डॉल्फिन, व्हेल यांच्यावर झालेल्या संशोधनात! मानवालाही ते लागू पडतं. शारीरिक व्यायाम, भावनांचं संतुलन, सामाजिक अभिसरण, गीतेचं तत्त्वज्ञान हे सारं अंगिकारलं तर 'साठी बुद्धी नाठी' जाऊच द्या. उलट वृद्धत्वातही मेंदूच्या पेशी चक्क वाढू शकतात! सतत क्रियाशील राहण्यानं वृद्धत्व आश्चर्यकारकरीत्या सुखकर होतं. वयोमानाप्रमाणे रोग होणारच, पण त्याची तीव्रता आटोक्यात राहते.' 'भारत आणि अमेरिका - दोन्हीकडे आयुर्मान वाढतंय. भारतातील सरासरी वय ६५ तर अमेरिकेतील ८०! पुढील ३० वर्षांत ते ९०च्या जवळ जाईल. त्यामुळे निवृत्तीनंतर जर एवढं आयुष्य जगायचंय तर त्याचा सजग विचार व्हायलाच हवा. विज्ञान, विद्वत्ता, अनुभवाची परिपक्वता आणि शारीरिक-मानसिक सक्रियता या चतुःसुत्रीनं आपण हे आव्हान स्वीकारायचं आहे'!

डॉ. शरयू तुळपुळे, डॉ. अरुण, डॉ. गजानन सबनीस आणि अपर्णा हांडे यांनी वृद्धत्वाच्या विविध पैलूंवर भर दिला. साथीदाराच्या मृत्यूनंतर येणाऱ्या भावनिक एकाकीपणाला कसं तोंड द्यायचं, एकट्यानं आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं, संस्कृतीचा आरोग्यसुविधांवर कसा परिणाम होतो, याबरोबरच, डॉ. गजानन सबनीसांनी निवृत्तीनंतर दोन्हीकडे (भारत-अमेरिका) विभागून कसं राहता येईल याचीही दिशा दाखवली.

विद्या सप्रे यांनी भारत/अमेरिकेत समाजसेवा करून निवृत्ती कशी अर्थपूर्ण होऊ शकेल यावर विवेचन केलं. 'सोळावं वरीस धोक्याचं' तसं 'साठावं वरीस 'मोक्याचं' असल्याचं सांगून स्वयंसेवा करण्याच्या अनेक संधींना स्वीकारण्याचा विचार मांडला. त्याच अनुषंगानं गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात शस्त्रक्रिया आणि मोफत कॅन्सर तपासणी व इतर वैद्यकीय प्रकल्प राबवणाऱ्या पुण्यातील 'समवेदना' संस्थेतर्फे प्रीती दामले, 'ज्ञानप्रबोधिनी' या अनेक उपक्रम राबवणाऱ्या पुण्यातील संस्थेतर्फे सुपर्णा गोखले आणि न्यूजर्सीतील संस्थेतर्फे जगदीश वासुदेव यांनी आपल्या संस्थाची माहिती आणि तपशील देऊन निधी संकलनाचे आवाहन केले. भारतातील ज्येष्ठ नागरिक संघांप्रमाणेच उत्तर अमेरिकेतील विवि‌ध ठिकाणांहून आलेल्या संघांनी आपले उपक्रम, अनुभव सर्वांबरोबर वाटून घेतले.

२०१३च्या अधिवेशनात मोहन रानडे यांनी भरपूर परिश्रम घेऊन ५५ वर्षांवरील अमेरिकास्थित मराठी लोकांची डिरेक्टरी प्रसिद्ध केली. संकेतस्थळही निर्माण झालंय, मात्र सप्रे दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार 'उत्तररंग' हा कुणा एकाचा क्लब नाही तर ती 'संकल्पना' आहे!

कीर्तनात जसे पूर्वरंग उत्तररंग असतात तसे ते जीवनातही असतात. अमेरिकेत तर ते आणखीनच गुंतागुंतीचे! कारण पूर्वरंगात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं आल्यानं त्याभोवतीच सारे संदर्भ फिरतात, मात्र उत्तररंगात हे संदर्भ बदलतात, निर्णय नव्यानं घ्यावे लागतात, घर बदलावं का? लहान घरात केव्हा जावं? भारतात परत जावं का? सहा-सहा महिने विभागले, तर ते किती दिवसांत झेपेल? मुलांच्याच गावात वेगळं राहिलो आणि त्यांनी नोकरी बदलली तर? गावातल्या रिटायर्ड कम्युनिटीमधील अमेरिकन जीवनप्रणाली आपल्याला रुचेल आणि पचेल का? दोघांच्या जेवणखाणं-मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असल्याचं जाणवतंय का? खाणंपिणं, संगीत, मित्रमंडळींबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी करणे याबाबत आपण जास्त भारतीय होत चाललोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांना भिडताना त्यांना वाटतं की हे एकट्याचे प्रश्न नाहीत आणि स्वतंत्रपणे सोडवताही येणार नाहीत. त्यासाठी एकत्र यायला हवं. थोडक्यात आपण आपले उत्तर आयुष्य सुखा-समाधानात कसे घालवू शकू याच्या मार्गदर्शनासाठी लागणाऱ्या आचार-विचारांची, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उभा केलेला रंगमंच म्हणजे उत्तररंग! या उपक्रमाचं महत्त्व इथे दिवसेंदिवस वाढत राहणार आहे, कारण उत्तर आयुष्यात प्रवेश करणाऱ्या मराठी भारतीयांची संख्या वाढतच जाणार आहे. अमेरिकेतल्या प्रत्येक मराठी माणसाला उत्तररंग जिव्हाळ्याचा वाटला पाहिजे हे संयोजकांचं सूत्र आहे. 


-ज्योत्स्ना नाईक
( महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्य़ाने- ११ जुलै २०१५)

Thursday, January 30, 2014

पैलतीर




"कृष्ण! कृष्ण!" घारुअण्णानी कपाळावरचा घाम पुसला. उन्हे वाढली होती. ऊष्ण रखरखीत वाटेवरून बराच वेळ चालून त्यांचे म्हातारे पाय थकले होते. बरेच अंतर अजून बाकी होते. कोणी पांथस्त साथिला मिळाला तर बरे होईल असा त्यानी विचार केला. कपाळावर हात ठेवून दूरवर चौफेर नजर फिरवली. कोणीही नव्हते. "हूँ" एक सुस्कारा सोडुन त्यानी पुन्हा वाट तुडवायला सुरुवात केली. थोडेसे अंतर काटल्यावर आपल्याला कोणितरी हाक मारत आहे असा त्याना भास झाल. त्यांनी मागे वळून पाहिले. कोणिही दिसेना. "भासच असावा. अशा निर्जन ठिकाणी आपल्याला ओळखणारे कोण भेटणार?" पण लांबून परत एक हाळी आली. "सर! सर!!" दूरवरून एक आकृती त्यांच्यादिशेने धावत येत होती. "आपला विद्यार्थी? ह्या ठिकाणी?" त्यानी डोळ्यावरचा चष्मा काढला, साफ केला आणि परत डोळ्यावर चढवला. हळूहळू ती आकृती सुस्पष्ट होत गेली. एक सतरा आठरा वर्षाचा पोरगा होता. धावत धावत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. ".....सर!......."
"अरे हो हो हो! दम घे! कोण तू? मला कसा ओळखतोस?"
"वा सर! तुम्हाला कोण ओळखत नाही? मी मधू!" एक मोठा श्वास घेऊन त्याने उत्तर दिले. "कुठे चाललात एवढ्या उन्हात?"
"पलीकडच्या गावी जायचे होते! पण तू कुठे चाललास?" घारूअण्णा गावच्या शाळेत संस्कृत शिकवायचे. "आपलाच विद्यार्थी हा! आता नाव आठवत नाही हे खरे. पण कुणाकुणाचे नाव लक्षात रहाणार?"
"मी ही तिकडेच चाललो आहे. चला! तुम्हाला सोबत करतो. एकटेच चाललात?"
"हो रे!"
"वाईट वाटून घेऊ नका. पण मुलगा, सून, बायको कुणी बरोबर नाही म्हणून विचारतो."
"कृष्ण! कृष्ण!!" एवढेच शब्द घारूअण्णानी कसेबसे उच्चारले.
"माफ करा! आपल्याला अडचणीत आणायचे नव्हते मला! चार गप्पा मारल्या की उन्हाचे चटके जाणवत नाहीत. म्हणून काहितरी विचारले" मधू शरमून म्हणाला.
"अरे! माझ्या म्हातार्‍याच्या आयुष्यात काय आहे लपवण्यासारखे? एक मुलगा होता रे! जगातला सगळ्यात गुणी मुलगा होता. श्रावणबाळासारखा काळजी घ्यायचा आमची. अवघ्या सोळाव्या वर्षी अपघातात दगावला." घारूअण्णांचे डोळे पाणावले. "कृष्णाला दया कशी आली नाही रे त्याचा प्राण घेताना? काय वाईट केले होते त्याने कुणाचे?" घारूअण्णाना एकदम भरून आले.
"परमेश्वराचा खेळ आहे सगळा सर!"
"सर! तुम्ही छत्री नाही आणली बरोबर? काय उन आहे!" मधूने विषय बदलायचा प्रयत्न केला. त्याने आपली छत्री घारूअण्णांच्या डोक्यावर धरली.
"तो धक्का माझी पत्नी सहन करू शकली नाही." घारूअण्णांचे डोळे पाण्यानी डबडबले.
मधूला घारुअणांची ती परिस्थिती पहावेना. त्यानी अलगद अण्णांच्या पाठीवरून हात फिरवला. आपल्याकडील रुमालाने त्यांचे डोळे पुसले. अण्णाना जरा मन मोकळे झाल्यागत वाटले. सूर्य ढगाआड लपला. अचानक त्या भट्टीसारख्या तापलेल्या वातावरणात थंड वार्‍याची नाजाणे कुठून झुळूक आली. अण्णांच्या समोर त्यांचा जीवनपट तरळू लागला. मुग्ध बालपण, आईच्या मायेच्या पदराआड लपून घालवलेले ते रम्य दिवस, वडिलांचा मार, शाळेतली मौज, कॉलेजचे तारुण्यानी सजवलेले, जग जिंकायचा उत्साह असलेले, ध्येयाने भारावलेले आणि यौवनाच्या मस्तीत ओतप्रोत भरलेले धुंद दिवस, लग्न, प्रणय, सुपुत्राचा जन्म. काय सुंदर दिवस होते ते! घरी आल्यावर प्रेमाने भाकरतुकडा ओवाळणारी आणि हसत हसत स्वागत करणारी आई अचानक एके दिवशी भिंतीवरच्या तसबीरीमधे जाऊन बसली. किती विनवले अण्णांनी! पण खाली उतरायला तयारच होईना ती. "कृष्ण! कृष्ण!!" अण्णांच्या अयुष्यातला पहिला आघात होता तो. पण ही फक्त सुरुवात होती. असे अनेक आघात त्याना सहन करायचे होते. काही दिवसानी त्याना फटकावून काढणारे, पण आभाळाएवढे प्रेम करणारे त्यांचे वडील देवाघरी आणि अण्णा पोरके झाले. पण किरणच्या, त्यांच्या मुलाच्या बोबड्या बोलांनी त्यांचे दु:ख हलके झाले. किती गोड होता किरण! त्याचे ते अडखळणारे पहिले पाऊल, तो पहिल्यांदा आई, बाबा बोलला त्यावेळी त्याना झालेला आनंद, तो त्यांच्या बोटाला धरून त्यांच्या शाळेपर्‍यंत येत असे. त्यांनी धरून किरणला सायकल चालवायला शिकवले होते. संध्याकाळी त्याला शेजारी बसवून शुभंकरोति म्हणत अण्णा. नकळत त्यांच्या चेहेर्‍यावर हास्याची पुसट रेषा उमटली.
पायाला ओले ओले काहितरी लागले तसे अण्णा भानावर आले. समोर एक लहानसा ओहोळ होता. ते पोटभरून पाणी प्याले. आणि मग अचानक त्याना आठवण झाली. "मधू!!! बाळा कुठे आहेस रे?"
"हा काय! मी तुमच्या पाठी होतो. तुम्ही विचारात गर्क होतात."
"हं!" आता हा ओहोळ कसा पार करायचा? त्यानी जरा इकडे तिकडे जाऊन प्रवाह कुठे अरुंद होतो आहे का पाहिले. शेवटी तो प्रयत्न सोडून दिला. "मला नाही जमणार हा ओहोळ ओलांडायला." त्यानी नैराश्याने उद्गार काढले.
"छोटासा तर आहे. एक काम करुया. मी तुम्हाला पाठीवर उचलून घेतो. घाबरू नका हो! पाडणार नाही मी तुम्हाला"
मधूने अण्णांना पाठुंगळीला घेतले आणि ओहोळ पार करून दिला.
आता उन्हे उतरली होती. गाव बराच मागे राहिला होता. गावात त्यांचे कोणिही नव्हते पण का कुणास ठावूक त्याना अचानक गावाची ओढ वाटू लागली. दूरवर वेशीवरचे दिवे लुकलुकत होते. आपल्या घराचे काय झाले असेल? रोज न चुकता पोळी भाजी करून देणारी शोभा त्याना घरात शोधत असेल काय? गुणी पोर! "अण्णा तुम्ही एवढ्या लोकाना फुकट गीता शिकवता, मग तुम्हाला मी पोळ्या भाजी दिली करून मग काय झाले? पुण्यच लागेल मला!" ती अण्णना रोज म्हणायची. पैसे देऊ केले तरीही घ्यायची नाही. तिच्या लग्नात देईन तिला एक मस्तपैकी शालू. अण्णानी मनात ठरवले होते. तिला कोण देणार शालू? अध्यात्म मंदिराचे लोक येतील गीता शिकायला. कोण शिकवणार त्याना गीता? दहावी बारावीची पोरे येतील संस्कृत शिकायला. त्यांचे महत्वाचे वर्ष. मी सुद्धा वेड्यासारखा घर सोडून आलो. अजून किती कामे राहिली आहेत. परत फिरायला हवे. अण्णा वेड्यासारखे मधूला सांगत होते.
"सर! गाव खूप दूर राहिला. सूर्यास्त होत आला आहे. आता परत फिरणे अशक्य आहे." मधू ठामपणे बोलला.
"अरे वेड्या! भराभर पाऊले उचलली तर पोहोचू. उद्या निघू परत." अण्ण हट्ट सोडेनात. गावाच्या आठवणीनी ते हळवे झाले. केवढे प्रेम दिले गावाने त्याना! किती सुंदर अयुष्य होते त्यांचे तिथे. छे! परत गेलेच पाहिजे! अण्णा मधूला विनवणी करू लागले.
"सर! माझ्या डोळ्यात डोळे मिळवून पहा एकदा. ओळखा मला! मी मधुसूदन कृष्ण! ज्याची गीता तुम्ही लोकाना शिकवता तो! तुमची आई बनून तुम्हाला प्रेमाने जवळ घेणारा मीच! तुमचा बाप बनून तुम्हाला जगात जगण्यासाठी लायक बनवणारा मीच! तुमची पत्नी बनून तुमचे सुखदु:ख वाटणाराही मीच! मीच तुमच्या किरणच्या तोंडून बोबडे बोललो. मीच शोभा बनून तुम्हाला भाकर खावू घातली. उन्हात तुम्हाला चटके बसल्यावर मीच तुमच्या डोक्यावर छत्र धरले. तुम्हाला दु:ख झाल्यावर मीच तुमचे डोळे पुसले. सुखद आठवणी आल्यावर तुम्हाला माझा विसर पडला, पण तरीही मी तुमच्या पाठीशी राहीलो. निसरड्या जमिनिवरून मी तुम्हाला उचलून वाहून नेले. तुमचा गाव दूर रहिला सर! पैलतीर जवळ आले आता."
"मधू?" अण्णांचे सर्व अंग कंप पावू लागले. "तू?.........." शब्द जिभेवर गोठले. हवेत एक दैवी सुगंध पसरला होता. त्यांच्या जिभेवर एक अवीट गोडी तरळत होती. "देवा!!!!!!!!" त्यानी हंबरडा फोडला! "देवा! सर्व काही संपले रे! तरीही जिवाला ही कसली ओढ लागली आयुष्याची? सुकले पान तरीही देठ अजून हिरवा का रे? का धरून राहिले आहे हे पान वृक्षाला? का सुटत नाही मोह? कसले बंध आहेत हे? का तुटत नाहीत?" त्यांच्या डोळ्यातून आश्रूंचा बांध फुटला होता. मग बराच वेळ ते तसेच रडत होते. मग अचानक नव्या चैतन्यानी त्यांचा देह थरारून उठला. मान वरती करून त्यानी मधूच्या डोळ्यात पाहिले. "देवा! मी तुला आता पूरते ओळखले. माफ कर मी तुला आधी नाही ओळखू शकलो. ह्या म्हातार्‍यापायी तुला कष्ट झाले. देवा! एकच विनंती आहे. इथपर्‍यंत साथ दिलीत. आता ह्या म्हतार्‍याला वेशीपलिकडे सुद्धा घेऊन जा! माझे चित्त विचलीत होत आहे. त्याला भरकटू न देता पैलतीरी पोहचवा!" मधूला प्रेमभराने मिठी मारून अण्णा शेवटचे शब्द बोलले 


"कृष्ण! कृष्ण!!"

http://www.maayboli.com/node/1836 यावरुन साभार..

Wednesday, January 29, 2014

चिनी नववर्ष दिन

 
सिंगापूर पर्यटकांचा आवडता देश. इथे ७६% चीनी १४% मलेशीयन तर ७% भारतीय आणि इतर नागरीक वास्तव्य करतात. सर्व धर्मांचे सणवार ऊत्साहाने इथे साजरे होतात. त्यातील ख्रिसमस आणि चीनी नववर्षदिन हे प्रमुख. त्या निमित्ताने देशभर केली जाणारी रोषणाई केवळ अप्रतीम. ह्या वर्षी ३१ जानेवारीला चीनी नववर्षाची सुरवात होते आहे.चंद्राला पृथ्वी प्रदक्षणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावर नव वर्ष कधी सुरू होणार ह्याचं गणित आहे.त्यामुळे जानेवारीच्या अंतिम पंधरवडया पासून ते फ़ेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडयात कधीही ही तारीख येऊ शकते.   

वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ साजरा केला जाणारा हा उत्सव.परंपरेनुसार १५ दिवसांचा.गेल्या वर्षी snake year होतं तर ह्या वर्षी Horse year आहे.१२ प्राणी १२ वर्षांचं १ आवर्तन पूर्ण करतात. त्या विशई अशी अख्याईका सांगीतली जाते की गौतम बुध्दा ने ज्या वेळी प्रुथ्वीवरील प्राणीमात्रांची रजा घ्यायची ठरवलं त्या वेळी त्याने सर्वांना बोलावणं धाडलं त्या वेळी हे १२ प्राणि त्याच्या भेटीस गेले.म्हणून त्यांची नावे त्या वर्षांना दिली गेली.

सर्व नातेवाईक ह्या सणाच्या निमित्ताने एकत्र येतात.घरं साफ़सुफ़ होतात.लहानांना आणि नवपरिणीत जोडप्यांना लाल रंगाच्या पाकीटातून lucky coins(नाणी)   देण्याचा रिवाज आहे. लाल रंग शुभं मानला जातो. तसंच घरांमधे आणि दुकानांन मधे  छोटया छोटया संत्र्यांनी लगडलेली संत्र्यांची झाडं  दर्शनी भागात ठेवण्याचीही प्रथा आहे.

सिंगापूर मधे रोषणाई , आतषबाजी बरोबरच पारंपारीक लायन डान्सचही आयोजन ठीक ठीकाणी होत.त्याचबरोबर चिंगे परेड ही सर्व धर्मी नागरिकांच संस्कृति प्रदर्शनचं म्हणता येईल.त्या बरोबरच मरीना बे ला नदीकाठी एका मेळाव्याचही आयोजन होतं. तर अशा ह्या उत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे.रोषणाई झाली आहे.त्याचीच ही काही छायाचित्र खालील लिंक वर पहा 

https://www.facebook.com/rajashri.s.lele




Monday, June 27, 2011

पैलतिर - सुरेश भट




त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा !

ऐकली न येथे आपुलकीची बोली
बहरली न आशा मनात अंकुरलेली
सारखी विफलता व्यथा माझिया भाली
पलिकड हासतो जीवन-श्रेय-फुलोरा !

पलिकडे मनोमय स्वप्नांचा संसार !
पलिकडे सुगंधित गीतांचा झंकार !
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार !
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा !

Friday, February 4, 2011

आपल्यातला एक..

कुणीही स्वेच्छेने किंवा आनंदाने आपल्या लोकांपासून दूर राहाणे पसंत करत नाही. प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतात म्हणूनच आम्ही आपला देश सोडून जातो. अमेरिकेत येण्यापूर्वी मी कामाच्या निमित्ताने पाच वर्षे पुण्यात राहिलो होतो. अमेरिकेतली मराठी माणसे पुणेकरांपेक्षा मराठी संस्कृतीशी अधिक जोडलेली आहेत, असे मला वाटते.

मी मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या बोरीसिंह या छोट्याशा गावात राहणारा. पूवीर् आमच्या विदर्भात थोडी शेतजमीन असणारा शेतकरीही खाऊन पिऊन सुखी असायचा. आता शेती हा गरिबी आणि वेठबिगारीसाठी समानाथीर् शब्द बनला आहे. शेतकरी कर्जाने मरतो आहे. कर्ज किती, तर दहा हजार रुपयांपेक्षाही कमी म्हणजे फक्त २६० अमेरिकन डॉलर.

दहा हजारांसाठी माणसे मरत असताना मुंबईचे शांघाय बनवण्याच्या गमजा मारणे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यापेक्षा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे नाही का? मी अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशनमध्ये इंजीनिअर आहे. माझ्या पन्नासेक मित्रांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला १० डॉलर जमा करण्याचे ठरवले आहे. म्हणजे साधारणपणे ५०० डॉलर होतील. तेवढाच हातभार आमची कंपनी लावणार आहे.

त्यामुळे दर महिन्याला ४० हजारांची मदत उभी राहिल आणि महिन्याला किमान चार शेतकऱ्यांची कर्जे फेडता येतील. आमच्या या उपक्रमात अनेकजण जोडत आहेत.

प्रशांत कांबळे, अमेरिका

पैलतीर

भारताबाहेर विखुरलेल्या अनेक भारतीयांना या ब्लॉगवर वेगवेगळ्या आजवर बरीच दैनिके हे काम करीत आहेत . त्यांचे पर्यंत पोचणे ...आणि ते प्रसिद्ध होणे यासाठी बरेच मेल्स खर्ची पडतात.
हा एक नवा यत्न करीत आहे .
तुम्हाला यात काही सांगायचे असेल तर जरूर सांगा आणि लिहायला लागही..

आपला

सुभाष इनामदार
subhashinamdar@gmail.com
91-0-952596276

www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com